अशोक कांबळे ।
मोहोळ: विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असा सूर असला तरी आर्थिक बाजू भक्कम नसल्याने बाहेरून आलेले उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी राजकीय देव पाण्यात ठेवून आतापासूनच व्यूहरचना करीत आहेत.
हा विधानसभा मतदारसंघ गेली २५ वर्षे राष्टÑवादी काँग्रेस व काँग्रेसच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे नेते मनोहर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली होता. मनोहर डोंगरे यांनी राजन पाटील यांच्याशी उघड फारकत घेतल्याने राष्टÑवादीची ताकद विभागली आहे . सेना-भाजपाचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही . शिवसेनेलाही गटबाजीने ग्रासले आहे. मूठभर असणाºया भाजपामध्येही ढीगभर गटबाजी दिसून येत आहे . त्यामुळे सद्यस्थितीला तालुक्यात सर्वच पक्ष गटबाजीने ग्रासलेले दिसत आहेत . विद्यमान आमदार रमेश कदम तुरुंगात असल्याने मतदारसंघातील मतदारांची अवस्था घरका, ना घाटका अशीच झाली आहे .त्यामुळे आगामी विधानसभेत इच्छुकांची गर्दी वाढली आहे .
भारतीय जनता पार्टीकडून नागनाथ क्षीरसागर यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. स्थानिक व लोकसभा आणि दोन विधानसभा लढविण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे धाकटे बंधू संजय क्षीरसागर यांचा गतवेळी निसटता पराभव झाला होता. गतवेळेस शिवसेनेचे मनोज शेजवाल यांनीदेखील चांगले मताधिक्य मिळवले होते. तेही पुन्हा मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेकडून स्थानिक चेहरा म्हणून नागेश वनकळसे यांचे नाव समोर येत आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व स्थानिक असणारे दादासाहेब पवार हेही सक्रिय आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. पुण्याचे उद्योजक सुभाष जगताप हे माजी आ. राजन पाटील यांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. राष्टÑवादीच्या महिला निरीक्षक निर्मला बावीकर यांनीही मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. पुणे येथील राष्टÑवादीचे पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमशेठ वडवे यांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क ठेवला आहे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सूतकर, राहुल क्षीरसागर यांच्यासह अजय गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.
राजकारणात उभी हयात घालविणारे पाच वेळा आमदार तर दोन वेळा मंत्रीपद भोगलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सध्या राष्टÑवादीपासून अलिप्त असले तरी नेमकी त्यांची भूमिका काय याबाबत मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही . त्यांची भूमिका या विधानसभेत कोणाच्या तरी फायद्याची किंवा कोणाच्या तरी तोट्याची ठरणार, हे मात्र काळच ठरवणार आहे.याचबरोबर काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा काँग्रेसचे मागास सेलचे अध्यक्ष गौरव खरात यांनीही तयारी सुरू केली आहे.या मतदारसंघात मोहोळ तालुक्यासह उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील गावे असल्याने त्या त्या भागातील नेत्याची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे .