नारायण चव्हाण
सोलापूर : मंद्रुपच्या राजकारणामुळे भाजपाच्या सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात लढण्याचे बळ मिळाले़ त्याच मंद्रुपमधून आता सहकार मंत्र्यांच्या वाटेत काटे पेरले जात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये होणारी विधानसभा निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा नवा अध्याय या मतदारसंघात पुढे येण्याची शक्यता आहे.
सन २०१३ मध्ये असंतुष्ट काँग्रेस नेत्यांनी देशमुखांना मतदारसंघात लढण्याचे अप्रत्यक्ष निमंत्रण दिले; पण गोपाळराव कोरे यांनी चहा - पानाच्या निमित्ताने आपल्या घरी आमंत्रित करून गळ घातल्यानंतर मात्र त्या देशमुखांनी डोळे विस्फारले अन् ‘दक्षिण’मध्ये लढण्याचा विचार सुरू केला. याच काळात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला. देशमुखांनी नंतर विजय संपादन केला; पण एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मंद्रुपचे गोपाळराव कोरे आणि गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी स्थानिक राजकारणातून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी सुभाष देशमुख यांच्यापासून फारकत घेत ग्रामपंचायतीची तयारी सुरू केली.
दरम्यान देशमुखांनीही स्वतंत्र फळी निर्माण केली़ तिरंगी लढतीत मंद्रुप ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आणि तिथूनच सुभाष देशमुख व आप्पाराव कोरे यांच्यातील शीतयुद्धाचा प्रारंभ झाला. ऊस तोडणी मजुरांच्या नावाने लोकमंगल कारखान्याचे कर्ज प्रकरण, लोकमंगल मल्टिस्टेटचे दूध भुकटी अनुदान प्रकरण आप्पाराव कोरे यांनी लावून धरले.
या दोन्ही प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. ज्या मंद्रुपमुळे त्यांना राजकीय स्पेस साधता आली त्याच मंद्रुपमधून आता त्यांना कडवा विरोध होत आहे. या प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले आप्पाराव कोरे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता अधिक आहे.
नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी सहकार मंत्री गटाचा पाडाव केला. त्यामुळे साहजिकच माने यांचे मनोबल वाढले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यातच रंगतदार सामना होणार हेही स्पष्ट आहे. गतवेळच्या निवडणुकीतील सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत तडजोडीची भूमिका स्वीकारल्याने ते काँग्रेससोबतच राहणार, असे तूर्तास गृहीत धरायला हरकत नाही. सेनेचे अमर पाटील यांचीही निवडणूक तयारी सुरू असली तरी सेना - भाजपा युती झाल्यास त्यांची भूमिका कशी राहील हे त्याचवेळी स्पष्ट होईल.
राष्ट्रीय बाजारचे मळभ दूर- बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे गेल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील संपर्क वाढवला . विकासकामांचा सपाटा सुरू केला . त्याचबरोबर विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय बाजारचे विधेयक विधिमंडळात सादर केले. विधेयक मंजूर झाले असते तर बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले असते . एका दगडात अनेक पक्षी मारण्याची देशमुखांची योजना विधेयक मागे घेतल्याने बारगळली . त्याचबरोबर देशमुख विरोधकांवर निर्माण झालेले बरखास्तीचे मळभ दूर झाले . विधानसभा निवडणुकीत ही मंडळी पुन्हा एकत्र राहणार, की वेगळी चूल मांडणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.