शिवानंद फुलारी
अक्कलकोट: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी यांच्यात थेट लढाई होण्याचे जवळपास निश्चित मानले जाते. गेल्या चार वर्षांत तालुक्यात झालेली राजकीय उलथापालथ पाहता ही निवडणूक दोघांसाठीही सोपी नाही.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सन १९९८ पासून मधली पाच वर्षे वगळता आ. म्हेत्रे हे करीत आहेत. म्हेत्रे आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यात २०१४ पर्यंत राजकीय खुन्नस होती. त्यानंतर पाटील भाजपापासून काही कारणामुळे लांब गेले. त्या कालावधीत आ. म्हेत्रे व पाटील एकत्रित आल्याने त्यांच्यासमोर कोणाचा निभाव लागणार नाही, अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकीत सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात भाजपाला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळत गेले. त्यामुळे कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. आगामी निवडणूक कल्याणशेट्टी यांच्याविरुद्ध होणार, असे समजून एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरूच आहेत.
म्हेत्रे यांनी बेरजेचे राजकारण करीत सिद्रामप्पा यांच्या पुत्रास झेडपीचे उपाध्यक्षपद मिळवून दिले. त्याबरोबर अगदी घरगुती कार्यक्रमातही त्यांच्यासोबत आहेत. कल्याणशेट्टी सत्तेच्या माध्यमातून आपल्या संस्थांना त्रास देत असल्याची आजही सिद्रामप्पा ओरड करीत आहेत. कल्याणशेट्टी यांनी याचा इन्कार केला आहे.
गेल्या चार वर्षांत म्हेत्रे यांनी विविध कामांमुळे कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. सार्वजनिक यात्रा, उत्सव, कार्यकर्त्यांचे वाढदिवस, घरगुती कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. कल्याणशेट्टी यांनी योग शिबीर, सिद्धेश्वर महास्वामींचे प्रवचन, गणेशोत्सव, व्याख्यानमाला, सामुदायिक विवाह असे कार्यक्रम घेतले. म्हेत्रे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे दौरे वाढविले. काँग्रेसमध्ये म्हेत्रे यांचा एकहाती कारभार आहे. भाजपात याच्या उलट आहे. दोघांच्या संघर्षामुळे आता कार्यक्रम घेणाºयांची गोची झाली आहे.
बेरजेचे राजकारण- सिद्रामप्पांना हाताशी धरून आ. म्हेत्रे यांनी तडवळ भाग आपलासा करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत सत्यात उतरणार हे काळच ठरवेल. भाजपामध्ये असणारे डझनभर पुढारी आणि सोलापूर बाजार समिती निवडणुकीनंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी झालेला विरोध कल्याणशेट्टी यांना अडचणीचा ठरणार आहे. दोघेही बेरजेचे राजकारण करीत असले तरी दुधनी भागातील मतदानावर घेतलेली कल्याणशेट्टी यांची शंका भविष्यातील संघर्षाची नांदी ठरणार आहे.