Solapur Politics; कोठे, शेख यांना काँग्रेसमध्ये घ्या : अशोक चव्हाण; शिंदे भेटले मात्र मी एमआयएममध्येच : तौफिकभाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:20 PM2019-03-01T12:20:17+5:302019-03-01T12:24:19+5:30
सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न ...
सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न करण्याची सूचना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या दोघांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला काँग्रेसभवनमध्ये उधाण आले आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण खासगी दौºयानिमित्त सोलापुरात आले होते. यादरम्यान त्यांनी सोलापूर लोकसभेच्या स्थितीचा कानोसा घेतला.
काँग्रेसच्या उमेदवाराची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांच्या घरवापसीवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्याशी चर्चा करून पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी त्यांनी सूचना केली होती. त्या धर्तीवर या दोघांना कोणत्या पद्धतीने परत आणता येईल, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाºयांमधून गुप्तगू सुरू होती़ कोठे व शेख यांना परत काँग्रेसमध्ये घेतल्यास शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण सोलापुरात फायदा होणार आहे. हे गणित ओळखून त्यांच्या घरवापसीची व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महेश कोठे यांची ‘राधाश्री’वर जाऊन भेट घेतली. शिंदे यांना घरापर्यंत आणण्याची जबाबदारी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी पार पाडली. यावेळी शिंदे यांनी फक्त महेश कोठे यांच्या तब्येतीची चौकशी केली, असे सांगितले जात आहे. कोठे शिवसेनेत असले तरी अद्याप त्यांच्या निवासस्थानी, त्यांच्या बैठक व्यवस्थेजवळ अग्रभागी शिंदे यांचे छायाचित्र आहे. यामुळे इतर पदाधिकाºयांना नवल वाटले आणि या भेटीची वेगळी चर्चा सुरू झाली. यानंतर एका कार्यक्रमात एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांनी शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत केल्यावर दोघांमध्ये व्यासपीठावर संवाद झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही गोळाबेरीज सुरू असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. कोठे यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे ते आराम करीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
महेशअण्णा यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे घरी आले होते. त्यांनी आरोग्याबाबतच चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणूक व इतर कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
- देवेंद्र कोठे, नगरसेवक
एका लग्नात व जेवणाच्या कार्यक्रमात अशी दोन वेळा शिंदे यांच्याबरोबर भेट झाली़ यावेळी राजकीय काही बोलणे झाले नाही़ एमआयएम वंचित बहुजन आघाडीबरोबर आहे़या आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार आहे़
-तौफिक शेख
शहराध्यक्ष, एमआयएम़