- दीपक दुपारगुडे सोलापूर - पंढरपुरात सध्या आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. बुधवारी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे. आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झालेले आहेत. या यात्रेत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची विषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाची टीम अहोरात्र कार्यरत आहे. बनावट पदार्थ विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, पंढरपुरात आषाढी वारी काळात बासुंदी उत्पादन अन् विक्री करण्यास सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे.
पंढरपूर येथे आषाढी वारी सोहळा २०२४ संपन्न होत आहे. आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक पंढरपुरात येतात. या कालावधीमध्ये बासुंदी या अन्नपदार्थामधून अन्न विषबाधासारखे प्रकार मागे घडलेले आहेत. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सूचनेप्रमाणे सर्व दूध व दुधजन्य पदार्थ उत्पादक, विक्रेते यांना इशारा देण्यात आला आहे की, १५ जुलै २०२४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत बासुंदी उत्पादन व विक्री करू नये. आषाढी यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार (अन्न विषबाधा ) घडू नये याकरिता बासुंदीची सदर कालावधीमध्ये उत्पादन, साठा, विक्री करण्यात येऊ नये तसेच तयार भगर पीठ खरेदी करू नये, भगर हे योग्यरीत्या शिजवूनच खावावे, असे आदेशित अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.