सोलापूर : एप्रिल महिन्यात रेल्वेकडून कुर्डूवाडी सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता हुतात्मा एक्स्प्रेसला चार डबे वाढविण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मुख्यालयाला पाठविला आहे.
सध्या सोलापूर विभागात रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वे विभागातून धावणाºया प्रत्येक गाडीमधील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे़ दरम्यान, याच काळात एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. यामुळे साहजिकच रेल्वेकडून दहा ते पंधरा दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सोलापूर मंडलाने हुतात्मा एक्स्प्रेसला अतिरिक्त चार डबे वाढवावे, अशा मागणीचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविला आहे़ सोलापूर-पुणे अशी धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी १५ जुलै २००० साली सुरू करण्यात आली़ ही गाडी पुणे-दौंड-कुर्डूवाडी-सोलापूर यामार्गे धावते़ ही गाडी सोलापुरातून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सुटते अन् दहा वाजून तीस मिनिटांनी पुण्यात पोहोचते, तर पुण्यातून ही गाडी सहा वाजता सुटून रात्री दहा वाजता पोहोचते़
२२ डब्यांची होणार हुतात्मा- हुतात्मा एक्स्प्रेसला सुरुवातीच्या काळात १४ डबे होते़ त्यानंतर प्रवाशांची वाढती गर्दी व प्रवासी संघटना, संस्था, लोकप्रतिनिधींकडून होणारी वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने या गाडीचे ४ डबे वाढविण्याचा निर्णय घेतला होता़ सध्याच्या काळात या गाडीला १८ डबे होते़ मात्र आता एप्रिल महिन्यात होणाºया ब्लॉकच्या काळात हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी पाहता आणखीन ४ डबे वाढवावे, यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिराडे यांनी दिली़
प्रवाशांची वाढती गर्दी व हुतात्मा एक्स्प्रेसला वाढता प्रतिसाद पाहता आणखीन चार डबे वाढविण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयास पाठविण्यात आला आहे़ ब्लॉक कालावधीच्या आत या वाढत्या चार डब्यांना मंजुरी मिळेल, अशी आशा आहे़ प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज आहे़ गैरसोयीच्या काळात प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे़ - प्रदीप हिराडे,वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर मंडल