सोलापूर : प्रवाशांची वाढती संख्या, असुरक्षितता आणि गुन्ह्यांचे प्रमाण यावर नियंत्रण आणण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागाला लोहमार्ग पोलिसांचे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी विभागीय व्यवस्थापकांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
वाडी-मनमाड आणि लातूर-मिरज या ९४८ कि़मी़च्या क्षेत्रफळातून दररोज किमान १० हजार प्रवासी प्रवास करतात़ या प्रवाशांसाठी लोहमार्ग पोलिसांची संख्या अवघी २२० इतकी आहे़ अर्थात ४५-५० प्रवाशांमागे एक लोहमार्ग पोलीस असल्याची खंत विभागीय व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे
रेल्वेचे जाळे पश्चिम महाराष्ट्रात मोठे आहे विभागात लातूर, उस्मानाबाद, मिरज, पंढरपूर, कुर्डूवाडी, सोलापूर, पुणे मार्गावरुन दररोज किमान ४५ रेल्वे गाड्या सोलापूर स्थानकावर येतात, थांबतात आणि जातात़ रेल्वेतील अलीकडे गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता आहे ते मनुष्यबळ अत्यल्प असल्याचे विभागीय व्यवस्थापकांचे मत आहे.
सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची एकूण संख्या ही २२० आहे़ याचे प्रमाण काढले असता ४५ ते ५० प्रवाशांमागे एक पोलीस कर्मचारी ठरतो़ यापैकी सर्वच पोलीस हे रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी नाहीत़ यापैकी १/४ अंश पोलीस हे कार्यालयीन कामकाज, न्यायालयीन कामकाज आणि इतर कामात गुंतलेले असतात़
अशी आहे वस्तुस्थिती- दानापूर (बिहार) - १२००- भोपाळ (मध्यप्रदेश) - ५१०- सिकंदराबाद (तेलंगणा) - ४५५- झाशी (उत्तर प्रदेश) - ४४५- सोलापूर (महाराष्ट्र) - २२०
रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात आघाडीवर असलेल्या प्रमुख राज्यांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या सर्वात खाली आहे़ प्रवाशांची असुरक्षितता, वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत पोलिसांचे पुरेसे बल मिळणे अपेक्षित आहे़ त्यादृष्टीने पोलीस महासंचालकांकडे मागील महिन्यात पत्रव्यवहार करून त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला आहे़- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर
प्रवाशांच्या तुलनेत सोलापूर विभागात लोहमार्ग पोलिसांची संख्या ही अपुरीच असेल़ हे मनुष्यबळ इतक्यात लगेच पुरवणे शक्य नाही़ विभागीय व्यवस्थापकांकडून पत्रव्यवहाराद्वारे तसा प्रस्ताव आलाय का ते पाहून घेऊ.सर्व तांत्रिक अडचणीच्या अभ्यासाअंती मनुष्यबळ पुरवणे शक्य होणार आहे़ - जयजित सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक