सोलापूर : येथील रणजीपटू सलीम खान ( वय ६२) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामध्ये पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर मोदी कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोलापूरात १९९४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मुंबई या रणजी सामन्याकरिता त्यांची निवड झाली होती. परंतु त्यांना संघात घेतले नव्हते म्हणून त्यावेळी सोलापुरकरांनी थेट मैदानात सामना सुरु असताना घोषणाबाजी केली होती. त्यावेळी त्यांना थोड्या वेळासाठी मैदानात उतरविले होते.ते सोलापूर जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळले होते व त्यांनी जिल्हा संघाचे नेतृत्व केले होते. ते मुंबई येथील टाइम्स शिल्ड व कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळले होते. मुंबईतील क्रिकेट क्लबकडून केनिया व टांझानिया या देशाचा दौरा त्यांनी केला होता.
ते एस.टी. महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ते उत्कृष्ट यष्टीरक्षन करीत होते. पानगल हायस्कूल, संगमेश्वर या महाविद्यालयातून आणि साऊथ सोलापूर क्लब, युनायेड क्रिकेट या क्लबकडून ते खेळत होते۔ नंतर त्यानी स्व:ताच्या नावाने सलीम खान अकादमी सुरू केली होती.