मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा: बाजार समिती निवडणुकीसाठी राखीव जागेवरील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची उमेदवारी धोक्यात आली होती. याबाबत ३० मार्चला राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने आदेश काढून ही अट शिथिल केली. निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए ए गावडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर लिंबोळे यांनी लोकमतशी बोलताना दिली दरम्यान या निर्णयाने ग्रामपंचायत मतदारसंघातील १ आणि सेवा सोसायटीच्या मतदारसंघातील २ राखीव उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया यावेळेस राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राबविली जात आहे. निवडणुकीसाठी प्राधिकरणाने अनेक बदल केले आहेत, तर काही जाचक अटींचाही समावेश करण्यात आला होता. मंगळवेढा बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखलकरण्यास सुरुवात झाली आहे. ३ एप्रिल अंतिम मुदत आहे.राखीव जागेतील उमेदवार यांना निवडणुकीत जात पडताळणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडली तरच फॉर्म भरता येणार असल्याची अट लादली होती. यामुळे अनेकांची गोची झाली होती. अनेक इच्छुक निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर फेकले जाणार होते. पूर्वी निवडणुकीसाठी केवळ जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत होते. ही जाचक अट शिथिल करण्याची मागणी होत होती.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३० मार्च रोजी अट शिथिल करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीनंतरच प्रमाणपत्रासाठी उमेदवारांना फिरावे लागणार आहे.
असे आहेत आदेशव्यक्तीने नामनिर्देश प्रमाणपत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. व्यक्त्ती कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यानंतरच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र त्याने देणे बंधनकारक आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्याच्या दिनांकानंतर बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास झालेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल. तसेच ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र राहील, असे आदेश ३० मार्चला शासनाच्या सहकार विभागाच्या सचिवांनी जारी केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए ए गावडे व सहाय्याक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर लिंबोळे यांनी दिलीया निर्णयाचा यांना होणार लाभ....प्रत्येक बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडून येतात. यात सेवा सोसायटीचे ११, ग्रामपंचायत मतदारसंघात ४, व्यापारी मतदारसंघात २ आणि हमाल मतदारसंघात १ संचालक निवडून येतो.यातील ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ पैकी एक जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे, तर सेवा सोसायटीच्या ११ पैकी १ जागा ओबीसी आणि १ जागा व्हीजेएनटीसाठी राखीव जागेत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारला लाभ होणार आहे.