सोलापूर : विध्वंसक समाजविघातक कृत्य करणारे दहशतवादी घरात भाड्याने राहू शकतात, त्यामुळे आपल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केले आहे.
सध्याची परिस्थिती पाहता शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या भागात विध्वंसक, समाजविघातक घटक निवासी भागांमध्ये लपून बसू शकतात. शहरातील शांतता भंग होण्यासाठी खासगी व सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शहरातील घरमालकांनी तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून भाडेकरूंच्या वेशामध्ये दहशतवादी समाजविरोधी घटक विध्वंसक कृत्ये किंवा दंगली घडवून आणू नयेत. ती रोखण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे. ज्या घरमालकाने आपले घर भाड्याने दिले आहे, त्यांनी भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला जमा करावी.
ज्या घरमालकांनी किंवा मालमत्तेची खरेदी-विक्री भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीने घर, मालमत्ता किंवा राहण्याची जागा स्थानिक किंवा परदेशी लोकांना भाड्याने दिली असेल तर संबंधितांची माहिती घ्यावी. नाव, पासपोर्ट, राष्ट्रीयत्व, व्हिसा क्रमांक श्रेणी, ठिकाण, जरी केलेली तारीख, वैधता, नोंदणी ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहेत.
शहरात सर्वत्र राहतात भाडेकरू
- 0 शहरातील सर्व भागांत भाडेकरू राहतात. झोपडपट्टीसारख्या ठिकाणी ही भाडेकरूंची संख्या जास्त आहे. हद्दवाढ भागांमध्ये अनेकांनी घरे बांधले आहेत. मात्र, मालक सोलापुरात नसल्याने ते भाड्याने देतात. काही लोकांनी गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेली घरीही भाड्याने दिली आहेत. भाडे वेळेवर मिळत असल्याने घरमालकही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे भाडेकरी नेमका करतो काय? याची माहिती घरमालकांना नसते.
- 0 शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आहेत. या ठिकाणी संबंधित घरमालक आपल्या भाडेकरूंची माहिती देऊ शकतात.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार हा आदेश काढला आहे. घरमालकांनी सहकार्य करावे, संबंधित पोलीस ठाण्यामध्ये माहिती द्यावी.
- हरीश बैजल, पोलीस आयुक्त.