- संताजी शिंदे
सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बीए, बी. कॉमसह प्रथम वर्षाच्या ३३ अभ्यासक्रमाचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमधून चिंता व्यक्त केली जात असून परीक्षा विभागाचा कारभार अनियमित असल्याचे निदर्शनास येत आहे.
विद्यापीठाच्या निकालात बीए, बीकॉम, बीएस्सी प्रथम वर्ष, बीसीए एमसीए, बीएस्सी प्रथम वर्षाचा निकाल अद्याप दृष्टीपथात नाही. एकूण ३३ अभ्यासक्रमांचे निकाल लागणे अद्याप बाकी आहे. यात बहुतांश बीटेक, बीपीएड, बीएड, एमएड, बीफार्म, एमएस्सी, एमपीएड, एमबीए, एमएसडब्ल्यू, एलएलबी आदी अभ्यासक्रमांचे प्रथम, द्वितीय वर्षांचे निकाल लागणे बाकी आहे. बीटेक तृतीय वर्षाचे सर्वाधिक म्हणजे ६ हजार २०० आणि द्वितीय वर्षाचे पाच हजार तर प्रथम वर्षाच्या अडीच हजार उत्तरपत्रिका तपासणे बाकी आहे.
लॉ अभ्यासक्रमासाठी तीन महाविद्यालये आहेत. तीनही महाविद्यालयांवर प्रभारी प्राचार्य आहेत. तीनही महाविद्यालयांतील प्राध्यापक तासिका तत्वावर आहेत. त्यामुळे या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे. एलएलबी प्रथम वर्षाचे १ हजार ३३१ व द्वितीय वर्षाचे १ हजार ३२२ विद्यार्थी आहेत. प्रथम वर्षाचे अद्याप ९३६ तर द्वितीय वर्षाचे ३९१ उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे. निकाल लवकर लागत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.