- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन आ. रोहित पवार यांनी आज सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमला भेट दिली. याचवेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नुतनीकरण करण्यात आलेल्या पार्क मैदानाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. याचवेळी त्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.
रोहित पवार हे रविवारी मध्यरात्री सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी स्टेडियमला भेट दिली. त्यानंतर क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी त्यांचा एमसीएच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. त्यानंतर त्यांनी क्रिकेट असोसिएशन, खेळाडू, प्रशिक्षकांशी संवाद साधला. पवार म्हणाले सोलापूर जिल्हा असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर जास्तीत जास्त सामने खेळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
मुलींच्यासाठी सरावासाठी देखील एमसीए सकारात्मक विचार करीत आहे. टॅलेंट हंट संकल्पना राबवणार आहाेत आणि खेळाडूंना पुढे आणण्यासाठी व्यासपीठ तयार करणार आहाेत असेही पवार यांनी नमूद केले. दरम्यान एमपीएलच्या बाबतीत एमसीए सकारात्मक भूमिकेत आहे. लवकरच एक आनंदाची बातमी खेळाडूंना मिळेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. यावेळी क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांच्यासह प्रशिक्षक, खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधला संवादरोहित पवार यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.