- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमानंतर पालखी सोहळयाने धर्मपुरी येथे विसावा घेतला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माऊलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिनामाचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.
धर्मपुरी येथे माऊलीच्या पालखी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. पालखी सोहळ्यात आरोग्य विभागाने वारीमधील महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष सेवा उपलब्ध करून दिली आहे. धर्मपुरी येथे आरोग्य विभागाने उभारलेल्या तात्पुरत्या अतिदक्षता कक्षास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.