- शीतलकुमार कांबळे
सोलापूर - बोरी उमर्गे ( ता. अक्कलकोट) येथे राष्ट्रीय महामार्ग १५० वर वाहनाखाली चिरडून साळींदर ठार झाले. ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी घडली. वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोचले. त्यांनी शवविच्छेदन करून घटनेची नोंद करून घेतली.
सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरत आहेत. साळींदर देखील पाण्याचा शोध घेण्यासाठी जात असल्याची शक्यता वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. महामार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू होत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. शनिवारी झालेल्या अपघातात साळींदरचे शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. त्याजागी वाहने अतिशय वेगात येतात. वन्यजीवांनाही वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत.
सायाळ ही साळू या नावाने देखील ओळखली जाते. यांची साधारणता उंची 3 फूट असून ही कुरतळणाऱ्या प्रजातीचा प्राणी आहे. हा प्राणी सस्तन आहे. साधारणपणे सायाळ यांना मार्च महिन्यात पिल्ले होतात. शेतामध्ये जमिनीत बिळे करून हे प्राणी राहतात. बिळाच्या गाभाऱ्यात सायळ आपली कुटुंब घेऊन एकत्रित राहते.