सोलापूर : संचारबंदीच्या काळात सोलापूर शहरासह पाच तालुक्यातील ३० गावातील रास्त भाव धान्य दुकाने (रेशन दुकान) पूर्णपणे बंद राहणार आहे; मात्र स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची घरपोच सेवा सुरू राहील आणि घरातील धान्यच जर संपले असेल तर अशा गरजू लोकांना घरपोच धान्य दिले जाणार आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पाच तालुक्यातील ३० गावात व सोलापुरात संचारबंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रास्त भाव धान्य दुकानातून अन्नसुरक्षा कायद्यातून ८० टक्के आणि ग्रामीण भागात सुमारे ७० टक्के अन्नधान्य वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात कोणालाही अन्नधान्याची टंचाई भासणार नाही. संचारबंदी काळात दहा दिवस शहरातील सर्व ३४१ दुकाने बंद राहणार आहेत; मात्र अद्याप ज्या रेशन कार्डधारकांनी जुलै महिन्याचे धान्य नेले नाही. त्यांचे अन्नधान्य परत जाणार नाही. त्या ग्राहकांनी २७ जुलैनंतर अन्नधान्य रेशन दुकानातून घेऊन जावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
असे पुरविण्याचे नियोजनसंचारबंदीच्या दहा दिवसांच्या कालावधीत अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत असलेल्या गरीब, कामगार व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच धान्य पुरविण्याचे नियोजन केले आहे. अशा लोकांनी परिमंडळ ‘अ’ चे अधिकारी नंदकुमार धनगर, ‘ब’ चे नितीन वाघ,‘क’ चे अनिल गवळी आणि ‘ड’ च्या जयश्री मांडवे यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. केशरी कार्डधारकांनाही जूनचे धान्य दिले जाणार आहे. हे धान्य शासनाकडून अद्याप उपलब्ध झालेले नाही. पण हे धान्य येत्या काही दिवसात येणार असून, २७ जुलैनंतर या धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकारी पाटील यांनी सांगितले.
धान्याची नाही टंचाईकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी संचारबंदीची घोषणा केली आहे. या काळात नागरिक रस्त्यावर येऊ नयेत व त्यांच्यापासून संसर्ग वाढू नये असा हेतू आहे. त्यामुळे रेशन दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत; मात्र अन्नधान्याची वाहतूक सुरू राहणार असून, यामुळे टंचाई भासणार नाही असे पुरवठा अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.