- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - धनगर समाजाच्यावतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी मोहोळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाला होता. शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आक्रमक झालेल्या धनगर समाजाने रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या.
दरम्यान, मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातील धनगर समाज बांधव मोहोळ शहरात दाखल झाले. आंदोलनकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यानं काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आजच्या आंदोलनामध्ये पारंपारिक धनगरी वेशात अनेकजण सहभागी झाले होते. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. या आंदोलनात सरकार क्या हुता तेरा वादा ? आरक्षण आमच्या हक्काचं ? यासह अन्य विविध मागण्यांसंदर्भातील पोस्टर आंदोलकांच्या हातात दिसून आले. याचवेळी आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्याही उतरविल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.