- शीतलकुमार कांबळेसोलापूर - मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर स्वच्छता मॉनिटर उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आता सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी माणसे कचरा टाकत असताना दिसल्यास विद्यार्थी त्यांची चूक लक्षात आणून देतील.
इतरत्र कचरा टाकणे, थुंकण्याची सवय कायमस्वरूपी मोडून काढण्यासाठी शिक्षण विभागामार्फत स्वच्छता मॉनिटर हे अनोखे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. २०२२ मध्ये प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटरचे यशस्वी परिणाम अनुभवता, ह्या वर्षी मोठ्या स्तरावर राबवण्यात यावा अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.
शिक्षण विभाग जिल्हा समन्वयक आणि शाळा समन्वयकांचे प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे अपेक्षित नाही. विद्यार्थी स्वच्छता "दूत" नसून स्वच्छता "मॉनिटर" होण्याची जबादारी घेतील. म्हणजे कुठेही निष्काळजी कचरा टाकताना किंव्हा थुंकताना दिसले, की तिथल्या तिथे त्या व्यक्तीला थांबवून चूक दर्शवून देतील आणि सुधारायला सांगतील.
दोन महिन्याच्या ह्या अभियानात निवडलेल्या विद्यार्थ्यांना "महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर" आयडेंटिटी कार्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीला सर्वोत्तम ५ जिल्हे, १०० शाळा आणि ३०० विद्यार्थ्यांना मुंबई येथे समारंभपूर्वक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल.