- संताजी शिंदे
सोलापूर - आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना 'भारतरत्न पुरस्कार' देण्यात यावा अशी मागणी स्मृतीशताब्दी कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आली. स्मृतीशताब्दी निमित्त शाहू महाराज यांना सोलापूरात १०० सेकंद स्तब्ध राहून वंदन करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्ष २०२२ निमित्त, कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती, सोलापूर च्यावतीने कार्यक्रमाचे आयोजोन केले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून वंदन करण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, शताब्दी समितीचे विश्वस्त माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सचिन शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, सौरभ साळुंखे, सिध्दाराम वाघ, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रकाश ननावरे, पृथ्वीराज नरोटे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी प्रणिता सोनकांबळे, समता दूत यशपाल चंदनशिवे, राजश्री कांबळे, नालंदा शिंदे, संजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे व संयोजक माऊली पवार यांनी या वंदन कार्यक्रमामधील समितीच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करत राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली. समारोपाला समता सैनिक दलाने मानवंदना दिली.