रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : ३० वर्षांपूर्वी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील जे वैभव होते, ते पुन्हा यंदाच्या यात्रेत दिसावे यासाठी घराघरांवर, दुकानांवर, शासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई (लाईटच्या माळा) करण्याबाबत वीरशैव व्हिजन ही सामाजिक संघटना पुढे सरसावली असून, नंदीध्वज मिरवणूक मार्ग लख-लख दिव्यांनी उजळणार आहे.
दीड ते दोन हजार पत्रके वाटून, व्यापारी संघटना, असोसिएशनला पत्रे धाडून नंदीध्वज मिरवणूक मार्ग प्रकाशमय करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे.
यंदा यात्रा सोहळ्यातील सर्वच विधी वेळेत आटोपण्यासाठी विशेषत: अक्षता सोहळा दुपारी दीडच्या आत संपविण्यासाठी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी घेतलेल्या बैठकीत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, माजी नगरसेवक नंदकुमार मुस्तारे यांनी यंदाच्या यात्रेत ३० वर्षांपूर्वी असलेले वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी आवाहन केले होते. बाळीवेस, चाटीगल्ली, मीठ गल्ली, भुसार गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस चौक, पंचकट्टा परिसर, पार्क चौक, नवीपेठ आदी मिरवणूक मार्गावर व्यापाºयांनी आपल्या दुकानांवर दिवाळीप्रमाणे विद्युत रोषणाई करावी. त्यासाठी समाजातील युवा, संघटनांनी एक पाऊल पुढे टाकावे, अशी विनंतीही या दोघांनी केली होती.
बाळासाहेब भोगडे, नंदकुमार मुस्तारे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने यात्रेतील गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. व्हीजनचे चिदानंद मुस्तारे, आनंद दुलंगे, नागेश बडदाळ, राजेश निला, सिद्राम बिराजदार, शिवानंद सावळगी, विजय बिराजदार, श्रीमंत मेरु, विजयकुमार हेले, श्वेता हुल्ले, पौर्णिमा पाटील, वर्षा काशेट्टी, आशा पाटील, श्रीदेवी पाच्छापुरे, अंजली शिरसी, राजश्री गोटे, अमृता नकाते, पूजा निलंगे, सोमेश्वर याबाजी आदी कार्यकर्ते जनजागरण मोहिमेत सहभागी होणार आहेत.
‘मनपासह इतर खात्यांनाही सहभागी करणार’- पूर्वी यात्रेतील मिरवणुकीत दुकानांवर, घरांवर विद्युत रोषणाईबरोबर घरासमोर सडा टाकून रांगोळी काढण्यात येत होती. अलीकडे ही पद्धत कुठेतरी बंद झाल्याची शोकांतिका राजशेखर विजापुरे यांनी व्यक्त केली. यात्रेत गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महापौर शोभा बनशेट्टी, झेडपीचे अध्यक्ष, सीईओ, इतर खातेप्रमुखांना खास पत्र देऊन विद्युत रोषणाई करण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे विजापुरे यांनी सांगितले.
अशी यात्रा होणे नाही; मात्र यात्रेतील वैभव कुठेतरी हरवत गेले आहे. पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी यात्रेच्या १५-२० दिवस आधी जनजागरण मोहीम हाती घेऊन व्यापाºयांना, सेवाभावी संस्थांना विद्युत रोषणाई करण्याबाबत आवाहन करण्यात येईल.-राजशेखर बुरकुलेसंस्थापक- वीरशैव व्हिजन
नंदीध्वजांच्या माध्यमातून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घडते. शहरातील काही भागातून मिरवणूक निघत असताना शहर उजळून निघण्यासाठी व्यापाºयांनी आपल्या दुकानांवर विद्युत रोषणाई करुन यात्रेची शोभा वाढवावी.-चिदानंद मुस्तारे, भक्तगण