सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर पाळणे व इतर करमणुकीचे साहित्य उभारण्याची तयारी पंचकमिटीने केली आहे. याबाबतचा प्राथमिक आराखडा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. मैदानावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली असताना आकाश पाळणे आणि करमणुकीच्या स्टॉल्सचे साहित्य तेथे न्यायचे कसे, हा देवस्थानपुढे प्रश्न उभा ठाकला आहे.
यात्रेच्या अनुषंगाने सर्व समन्वयक अधिकाºयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी शिवाजी जगताप यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला देवस्थान यात्रा स्टॉल समितीचे प्रमुख बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टगी, शिवानंद पाटील, नीलकंठप्पा कोनापुरे, म्हेत्रे, पोलीस उप आयुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त सुकळे, पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, नरसिंग अंकुशकर, बाळासाहेब भालचिम, आपत्कालीन व्यवस्थापनचे बडवे, भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका आकुलवार आदी उपस्थित होते.
बैठकीत स्टॉल कमिटीचे प्रमुख भोगडे यांनी होम मैदानावर साकारण्यात येणाºया गोष्टींचा आराखडा सादर केला. स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाला धक्का न लावता आपत्कालीन रस्त्याच्या समांतर बाजूस डिझ्ने पार्क उभारण्यात येईल. याला लागून फूड स्टॉल असतील. हरिभाई देवकरण प्रशालेसमोर नेहमीच्या जागेत कृषी प्रदर्शनाचा स्टॉल असेल.
सुशोभीकरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या बाजूला जो मोठा प्रवेशद्वार आहेत त्याच्या डाव्या बाजूला फक्त स्टॉल लावले जाणार आहेत. एक बाजू भाविकांना जाण्यासाठी मोकळी ठेवण्यात येईल.
किरकोळ विक्रेते यावर अतिक्रमण करणार, त्यामुळे या मार्गावर पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची कायम गस्त ठेवा, अशी सूचना उप आयुक्त बांगर यांनी केली. दरवर्षीप्रमाणे यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंती समितीच्या सदस्यांनी केली.
सीसीटीव्ही कॅमेरे अन् आगविरोधी यंत्रणा...- मैदानावर खाद्यपदार्थ तयार करण्याचे स्टॉल असल्याने परिसरात ५० आगविरोधी यंत्रणा समिती खरेदी करणार आहे. सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत होम मैदानाचे सुशोभीकरण करताना मैदानाच्या १२ प्रवेशद्वारांवर सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिर समिती अतिरिक्त कॅमेरे बसविण्याची व्यवस्था करणार आहे.
साहित्य कसे आणणार?- महापालिकेने होम मैदान समितीच्या ताब्यात देताना ‘मैदानावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी’ अशी अट घातली आहे. त्यामुळे डिझ्ने लॅणडमधील करमणुकीच्या साधनांचे अवजड साहित्य मैदानात कसे नेणार याबाबत समितीने स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रांत अधिकारी जगताप यांनी इतके साहित्य नेण्यापुरते मुभा द्यावी लागेल, असे म्हटले तर महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाच्या उप अभियंता सारिका आकुलवार यांनी अटीप्रमाणे समितीला अंमलबजावणी करावीच लागेल, असे म्हटले आहे. विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी वाहन पार्किंगचा प्रश्न सुटला आहे. वाहनांना मैदानावर बंदी असेल तर हे साहित्य कसे आणणार हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले.
मैदानाची केली पाहणी- बैठकीनंतर सर्व सदस्य, पोलीस, महापालिका व महसूल प्रशासनाच्या अधिकाºयांनी होम मैदानावर जाऊन पाहणी केली. मंदिर समितीतर्फे मैदानावर साकारण्यात येणाºया स्टॉलचा कच्चा आराखडा अधिकाºयांना दाखविण्यात आला. मैदानाच्या उजव्या बाजूला पाळणे, मौत का कुआँ, वॉटर पार्क, ड्रॅगन शो अशी करमणुकीची साधने असतील. याला लागून पोलीस चौकी व खाद्यपदार्थांची दुकाने असतील. मैदानावर वाहनांना येऊ दिले जाणार नाही, तसेच वाहन पार्किंगचा पर्याय नॉर्थकोटचे मैदान ठेवण्यात आला आहे. पूर्वीच्याच ठिकाणी शोभेचे दारूकाम होईल.