सोलापूर : सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वज मार्गांवरील खड्डे यंदा स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नामशेष झाले आहेत़ वर्षानुवर्षे असलेल्या खड्ड्यांच्या समस्येतून यंदा मुक्ती मिळाली असली तरी रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या केबल वायरींची नवी समस्या उभी राहिली आहे़ त्या समस्या दूर करून यात्रा मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करावी, अशी विनंती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी मनपा, विद्युत विभाग, पोलीस प्रशासनास केले आहे.
महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, नगर अभियंता संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर, पंचकमिटी सदस्य बाळासाहेब भोगडे, मानकरी राजशेखर हिरेहब्बू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी यात्रा मार्गांची पाहणी करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यापासून पाहणीचा प्रारंभ झाला़ दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, मार्कंडेय मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, होम मैदान, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, शिवाजी चौक, सम्राट चौक, बाळीवेस, मधला मारुती, गुरुभेट, पार्क मैदान, भागवत थिएटर, काळी मस्जिद ते हिरेहब्बू वाडा येथे संपला़ नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील विद्युत, टेलिफोन, केबल वायरीचा विळखा हटविणे गरजेचे, केबल वायरी सर्वात जास्त त्रासदायक आहेत़ एखाद्या ठिकाणी केबलमुळे यात्रा थांबली तर मिरवणुकीस उशीर होतो असे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले़
समस्यांची जंत्री...- नंदीध्वज मार्गांच्या तीन तास चाललेल्या या पाहणीत अनेक समस्या जाणवल्या़ यात १३५ ठिकाणी केबल वायरींचा अडथळा, विद्युत वायरींची ७० ठिकाणी तर टेलिफोन केबल २१ ठिकाणी नंदीध्वज मार्गात अडथळा ठरत आहेत़ यंदाच्या वर्षी स्मार्ट सिटीमुळे खड्डे जवळपास नाहीत, ही जरी समाधानाची बाब असली तरी, भैया चौक ते नरसिंग गिरजी मिल डाव्या बाजूच्या झाडे छाटणे आवश्यक असून, बाबा कादरी मस्जिद, ते दत्त चौक-दाते पंचांग बोळ झाडे कापणे, सम्राट चौक ते जैन गुरुकुल शाळा झाडे छाटणे, जुनी मिल आनंदेईश्वर लिंग परिसर झाडे कापणे गरजेचे आहे़