आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूर शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रा. दरम्यान, ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीच्यावतीने विविध प्रकारची तयारी सुरू असून मंगळवारी यात्रेतील मानकरी सुहास दर्गोपाटील यांच्या घरी मंगलमय वातावरणात देव्हाऱ्यामध्ये दिवे बसविण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.
यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात, ही परंपरा ९०० वर्षांपासून चालत आली आहे. सोमवारी सकाळी यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसविण्यात आले. याप्रसंगी पूजाविधी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर राजीव हब्बू, अमित हब्बू, शिवकुमार हब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली. नीलाबाई दर्गोपाटील, महानंदा दर्योपाटील, रतन मानवी, श्रुती दर्गापाटील - बंडे, प्राजक्ता दर्गोपाटील- हेले, पद्मावती दर्गोपाटील, नीरज मानवी, प्रभुराज मानवी आदी उपस्थित होते.
कुटुंबातील सदस्यांनी 'श्रीं'च्या पूजेमध्ये भाग घेतला. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. मल्लिनाथ मसारे, मल्लिनाथ मुस्तारे, बाबूराव धुम्मा, कळके, राजकुमार बहिरो-पाटील, हब्बू आदी मानकऱ्यांच्या घरामध्ये यात्रेपूर्वी दिवे बसविण्याची परंपरा आहे.