सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा महिन्यावर येऊन ठेपली असताना होम मैदान आणि रंगभवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या स्मार्ट रोडचे काम वेळेत पूर्ण होणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. रंगभवन ते होम मैदान हा रस्ता सध्या दुचाकींसाठी खुला आहे. परंतु, हरिभाई देवकरण प्रशाला ते डफरीन चौक या मार्गावर खोदून ठेवलेले खड्डे आहे तसेच आहेत. मागील वर्षी खड्डे मार्गातून गड्डायात्रा करावी लागली. यंदा मात्र आम्हाला चांगला रस्ता मिळावा, अशा अपेक्षा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे हरिभाई देवकरण प्रशाला, होम मैदान परिसर, डफरीन चौक या भागात धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. रंगभवन चौकात तर खूपच धूळ असते. ज्या लोकांना अॅलर्जी, दमा आहे त्यांचा त्रास आणखी वाढला आहे. स्मार्ट सिटीची कामेही स्मार्ट पद्धतीने व्हायला हवीत. उद्या त्यातून आनंद मिळेल. पण आज त्यांना जो त्रास होईल त्याची भरपाई कशी मिळेल. या दुष्परिणामांचा विचार व्हायला हवा. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून सोलापूरकरांची सुटका करा. - डॉ. सुरेश व्यवहारे, रोटरी क्लब
मागील वर्षी धुळीच्या रस्त्यावरून मार्ग काढत गड्डायात्रेला जावे लागले होते. पुढच्या गड्डायात्रेपर्यंत होम मैदान आणि रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात तर तसे दिसत नाही. आम्हाला यंदा ‘खड्डायात्रा’ नव्हे तर चांगली ‘गड्डायात्रा’ हवी आहे. होम मैदानावर चांगली कामे होत असल्याचे दिसते. परंतु, ही कामे वेळेवर झाली तरच त्याला अर्थ आहे. ठेकेदाराच्या मागे लागून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. - सुनील चव्हाण, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना.
शहरातील जो भाग प्राइम लोकॅलिटी म्हणून ओळखला जातो तो दोन वर्षे बंद ठेवणे चुकीचे आहे. मागील वर्षी गड्डायात्रेसाठी रंगभवन ते होम मैदान येथील रस्ता खुला केल्यानंतर प्रचंड धूळ पाहायला मिळाली. यावर्षी डिसेंबरअखेर तुम्ही हा रस्ता पुन्हा खुला करणार असल्याचे सांगत आहात. मागील वर्षीप्रमाणे यंदा धूळ होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कामाचा वेग का वाढत नाही हे एकदा सोलापूरकरांना सांगा. -अॅड. सरोजनी तमशेट्टी.
ग्रामदैवत सिद्धेश्वराची गड्डायात्रा ही या शहराचे वैभव आहे. स्मार्ट रस्त्याच्या कामाचे थ्रीडी वर्क आम्ही पाहिले आहे. हे काम गड्डायात्रेपूर्वी पूर्ण झाले तर सोलापूरकरांना या स्मार्ट रस्त्यावरून गड्डायात्रेला येणे नक्कीच आवडेल. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यामुळे अनेक चांगली कामे होताना दिसून येत आहे. गड्डायात्रेपूर्वी त्यांनी स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण करून घेतल्यास सोलापूरकरांना निश्चितच आनंद होईल. - सिद्धाराम डोमनाळे, उद्योजक.
होम मैदानावर जाण्यासाठी डफरीन चौकाच्या बाजूकडील रस्त्याचाही वापर होतो. मागील वर्षी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. पायी जाताना आम्हाला धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. आतापासून तयारी केली तर मागील वर्षीप्रमाणे त्रास होणार नाही. होम मैदानावरही चांगले काम होत असल्याचे समाधान आहे, पण ते गड्डायात्रेपूर्वी पूर्ण करा. - वैशाली डोंबाळे, शिक्षिका.