सोलापूर : ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनचा पुढाकार पाहून मी स्वत: घरावर, दुकानांवर विद्युत रोषणाई केली. त्यानंतर घरी आलेले नातेवाईक, भेटलेले मित्र, व्यापारी मला विचारत होते, ‘क्या साब घर मे किसकी शादी है क्या ?’. त्यावर मी त्यांना ‘हां साब, शादी है लेकीन घर मे किसकी नही. शादी तो अपुनके सिद्धरामा की है’ असे सांगावे लागत असल्याचे बाळीवेस येथील व्यापारी समीर मणियार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
समीर मणियारसारख्या अनेक व्यापाºयांनी, भक्तगणांनी आपल्या इमारती, दुकाने लख-लख दिव्यांनी उजळून टाकली आहेत. जसा अनुभव समीर मणियार यांना आला तसाच अनुभव इतरांनाही आल्याचे सांगत होते.
‘लोकमत’ची संकल्पना घेऊन जनजागृतीसाठी जी संघटना पुढाकारासाठी सरसावली, त्या वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी स्वत:पासून सुरुवात म्हणून आपल्या शेळगीतील बनशंकरी नगरातील घर एलईडी दिव्यांनी उजळून टाकले. विश्वस्त सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, संजय साखरे, नागेश बडदाळ, राजेश निला, विजय बिराजदार, शिवानंद सावळगी, संगमेश कंटी आदीनींही घरावर रोषणाई केली आहे.
सिद्धरामेश्वरांची कृपा म्हणूनच यात्रा वेळेत-हिरेहब्बू
- - यंदा तैलाभिषेक, अक्षता, होमप्रदीपन आणि शोभेचे दारूकाम सोहळा नियोजित वेळेच्या आधीच पार पडले. ही सिद्धरामेश्वरांची कृपा आहे. मानकरी, भक्तगणांचे सहकार्य लाभल्यामुळेच यंदाची यात्रा साºयांच्याच नजरेत भरल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.
- - सर्वच विधी वेळेत पार पाडण्यासाठी ‘लोकमत’चे खूपच सहकार्य लाभल्याचेही त्यांनी गुरुवारी सायंकाळी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिल्यावर नमूद केले. यावेळी जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते. एकूणच यात्रेच्या आधी केलेले नियोजन, नंदीध्वजधारकांसाठी बनवलेली आचारसंहिता या आणि अन्य कारणांमुळे अगदी वेळेत यात्रा पार पडल्यामुळेच यंदा चारही प्रमुख सोहळ्यास महिलांची लक्षणीय गर्दी होती. नंदीध्वज मार्गावरही महिला आरती घेऊन नंदीध्वजाच्या पूजनासाठी सज्ज होत्या. पुढील वर्षीही याच पद्धतीने यात्रा पार पाडणार असल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लोकमत’च्या भेटीत सांगितले.
रिक्षाचालकाचे नंदीध्वजप्रेम- सोलापुरातील हौशी रिक्षाचालक सतीश कनकुरे यांनी आपल्या रिक्षाच्या समोरच्या भागावर नंदीध्वजाची छोटीशी प्रतिकृती बसविली आहे. जेव्हा कनकुरे आपली रिक्षा घेऊन शहरात फिरतात, तेव्हा सोलापूरकर मोठ्या कौतुकाश्चर्याने त्यांच्या रिक्षावरील या नंदीध्वजाकडे पाहतात. आपणही सोलापूरचा ब्रँड जपल्याचे ते सांगतात.