आप्पासाहेब पाटील, सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या ५६ घागरीची मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात मिरवणूक काढून मानकरी कुंभार घराण्याने या घागरी यात्रेतील मानकरी हिरेहब्बूंकडे सुपुर्द केल्या.
गुरूवारी, सकाळी साडेआठ उत्तर कसब्यातील कुंभार वाड्यात योगीराज कुंभार यांच्या निवासस्थानी दिवे बसविण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री गणराय आणि श्री सिध्दरामेश्वरांच्या प्रतिमेचे भक्तिभावनेने पूजन करण्यात आले. यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या ५६ घागरीची पूजाही करण्यात आली. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
यात्रेबाबत माहिती देताना यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले की, ११ जानेवारी रोजी योगदंड पूजन, १२ जानेवारी रोजी पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजास साज चढवणे, १३ जानेवारी रोजी तैलाभिषेकासाठी नंदीध्वजांची मिरवणूक, १४ जानेवारी रोजी सम्मती कट्ट्यावर अक्षता सोहळा, १५ जानेवारी रोजी सकाळी योगदंड, नंदीध्वजास गंगास्नान अन् रात्री होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा, १६ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम आणि लेसर शो, १७ जानेवारी रोजी देशमुख वाड्यात कप्पडकळी हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.