यशवंत सादूलसोलापूर : नंदीध्वज पेलणाºया सेवेकºयांसाठी पटवडा अतिशय महत्त्वाचा असतो... खरं तर हा न दिसणारा एक ऐवजच. बाराबंदीच्या आत कमरेला गुंडाळलेला पटवडा ३० ते ३५ फूट उंचीचा आणि सुमारे ८० ते १२५ किलो वजनाचा नंदीध्वज पेलतो... ७०० ग्रॅम सुताचा वापर करून तयार केलेला हा पटवडा आता आकर्षक स्वरूपात आला असून, युवक सेवेकºयांना रंगीत नक्षीदार विणकामाच्या पटोड्याचे मोठे आकर्षण आहे.
समस्त सिद्धेश्वर भक्तांची नंदीध्वजावरही नितांत श्रद्धा असते. सिद्धरामांच्या योगदंडाचे प्रतीक असलेले हे नंदीध्वज यात्रेतील मिरवणुकीत व्यवस्थितरित्या पेलला जावेत. कमरेत ठेवलेल्या नंदीध्वजांना भक्कम आधार मिळावा, यासाठी पटवड्याचा उपयोग केला जातो. हा पटवडा पूर्वी सुताचा दोर विणून तयार केला जायचा.
आता पटवड्याच्या स्वरूपामध्ये थोडासा आकर्षकपणा आणला आहे. दरवर्षी शेकडो युवक नंदीध्वज पेलण्याची सेवा करण्यासाठी यात्रेमध्ये सहभागी होतात. या युवा सेवेकºयांना नवीन स्वरूपाच्या पटवड्याचे मोठे आकर्षण आहे. पूर्वी पटवडा बांधण्याच्या जागी पितळी रिंग वापरली जायची. आता ही स्टीलची रिंग वापरली जाते, अशी माहिती विक्रेते उदयकुमार साखरे यांनी ‘लोकमत’ला दिली. साखरे यांच्यासह वाकळे हेही पटवड्याची विक्री करतात. नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू होताच दरवर्षी ३०० पटवड्यांची विक्री होते, असे साखरे म्हणाले.
पटोड्याची अमृतमहोत्सवी सेवा- सध्या सोमनाथ मेंगाणे यांच्याकडे असलेला पटोडा गेल्या ७५ वर्षांपासून उपयोगात आणला जात असून, या पटोड्याची अमृतमहोत्सवी सेवा भविष्यातही कायम राहील, असा विश्वास सेवेकºयांनी व्यक्त केला आहे. १९४३ सालापासून बाबुराव सोन्ना यांनी हा पटोडा वापरून नागफणीचा नंदीध्वज पेलला. त्यांनी हा पटोडा २१ वर्षे वापरला. त्यानंतर शिवशंकर भोगडे १७ वर्षे, सिद्रामप्पा मेंगाणे ३ वर्षे, जयदेवप्पा मेंगाणे ४ वर्षे, मल्लिनाथ मसरे ११ वर्षे, सुधीर थोबडे ७ वर्षे, संदेश भोगडे ८ वर्षे आणि आता सोमनाथ मेंगाणे गेल्या तीन वर्षांपासून हा पटोडा वापरत आहेत.
असा तयार होतो पटवडा...- सुतापासून लहान-मोठ्या आकाराचे दोरे तयार केले जातात. हे दोरे वेणी विणल्यासारखे विणले जातात. विणलेल्या सर्व दोºया एकत्रितपणे ओवून पटवडा तयार होतो. रामदास जाधव हे पटवडा तयार करणारे कारागीर असून, त्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय असून, पत्नी पौर्णिमा यांच्यासह कुटुंबातील सर्व जण मदत करतात. एका पटवड्याचे वजन सुमारे ७०० ग्रॅम असते. सव्वातीन ते चार फूट लांबीचे असते. पटवड्याच्या मध्यभागी नंदीध्वजाची पितळी गुडी बसण्यासाठी जागा केलेली असते. त्या ठिकाणचा भाग जरा अधिक मजबूत असतो. या खोलगट भागामध्ये साडेतीन इंच उंचीची गुडी बसविली जाते. कमरेला बांधण्यासाठी सोयीचे आणि काठी पेलताना निसटू नये, यासाठी अशी रचना केली जाते. पटवड्याची जाडी मध्यभागी अर्धा इंच आणि बांधणीच्या ठिकाणी पाव इंच असते. बुधवार पेठ जय मल्हार चौकातील राम जाधव वर्षभर पटोडे तयार करण्यात मग्न असतात. सोलापूरसह कर्नाटकातील अनेक शहरांमध्ये त्यांच्या पटवड्याला मागणी आहे.