सोलापूर : अठरा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले अॅड. रितेश मिलिंद थोबडे आणि त्यांची पत्नी श्रद्धा या नवदाम्पत्याने शुक्रवारी स्व. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात संबळाच्या निनादात अन् मंत्रोच्चारात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची विधिवत पूजा केली. या पूजनाने यात्रेतील धाििर्मक विधींना प्रारंभ होणार आहे. रविवारच्या तैलाभिषेकापासूनने यात्रा सुरू होणार आहे.
अक्षता सोहळ्याच्या आधी नववधू-वरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा, परंपरा आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले़ त्यानंतर सागर हिरेहब्बू, सुरेश हब्बू, मनोज हब्बू, तम्मा हब्बू, सदानंद हब्बू, राजेश हब्बू, विश्वनाथ हब्बू हे शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून, विभूती, कुंकूम, फुले वाहून संबळाच्या निनादात काही विधी पार पडले. यावेळी अॅड़ रितेश थोबडे, श्रद्धा रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू, हब्बू मंडळींची पाद्यपूजा केली.
केळीच्या पानावर योगदंडास नैवेद्य दाखविण्यात आला़ पूजा सोहळ्यात माजी नगरसेविका विजयाताई थोबडे, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद थोबडे, सुचेता थोबडे, ललिता थोबडे, राजश्री देसाई, मल्लिका थोबडे, वंदना बगली, रोहन बगली (विजयपूर, कर्नाटक), माजी नगरसेवक महेश थोबडे, सिद्धेश थोबडे आदी सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गुंडप्पा कारभारी, अॅड. राजेंद्र घुली, मल्लिनाथ जोडभावी, मानकरी सुधीर देशमुख, सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष मुनाळे, सुधीर थोबडे, प्रतीक थोबडे, आप्पासाहेब वांगी, तम्मा शेटे, अॅड. विनोद सोमवंशी, अॅड. राजकुमार मात्रे आदी उपस्थित होते. पूजा पार पडल्यावर पारंपरिक प्रसादाचा आस्वाद भक्तगणांनी घेतला.
कर्नाटकातील विजयपूर हे माझे माहेर. २४ डिसेंबरला विजयपूर येथे झालेल्या लग्नसोहळ्यात मी अॅड. रितेश थोबडे यांच्याशी विवाहबद्ध झाले. आज या घराची एक सून म्हणून मला पहिल्यांदाच योगदंडाच्या पूजनात सहभागी होता आले. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी थोबडे कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने माझा संसार सुखाचा, आनंदाचा जावा, हीच सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करते.- श्रद्धा रितेश थोबडे
घरातील लग्नाप्रमाणे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची आम्ही तयारी करतो. खास यासाठी चटणी कांडतो. योगदंडाच्या पूजेसाठी विविध प्रकारच्या १६ भाज्या बनवून श्री सिद्धरामेश्वरांना महानैवेद्य दाखविण्यात येते.त्यानंतरच आम्ही प्रसाद सेवन करतो. हा सोहळा दरवर्षी लवकर-लवकर यावा, असे आम्हाला सतत वाटत राहते. ही सर्वधर्मीय सलोख्याचे संबंध जोपासणारी यात्रा आहे. - सुचेता मिलिंद थोबडे