सोलापूर : स्मार्ट सिटी कंपनीने स्मार्ट रस्त्यांसाठी काढलेली ८८ कोटी रुपयांच्या निविदेला तिसºया वेळच्या अखेरच्या मुदतीत एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिला आहे. परंतु, त्यानेही या कामासाठी ८८ कोटी नव्हे तर ११४ कोटी रुपयांची तरतूद झाल्यानंतरच हे काम करण्याची तयारी दाखविली आहे. यावर आता स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदारांचे प्रतिनिधी यांच्यात खलबते सुरू आहेत.
सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने स्मार्ट सिटी एरियात काँक्रीट आणि डांबरी रस्ते तयार करण्यासाठी २६४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक निश्चित केले आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिद्धेश्वर मंदिर, विजापूर वेस ते कोंतम चौक यासह एकूण ८ रस्त्यांचा समावेश आहे.
या कामाचा पहिला टप्पा म्हणून ८८ कोटी रुपयांची निविदा अडीच महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली. परंतु, ठेकेदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तीनवेळा निविदेला मुदतवाढ मिळाली. अखेर तिसºया वेळी सोलापुरातील ठेकेदाराने जादा दराने निविदा भरली. ८८ कोटींऐवजी ११४ कोटी रुपये या कामासाठी मिळावेत, अशी मागणी या बड्या ठेकेदाराने केली आहे.
स्मार्ट सिटी एरियातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी मोठ्या कंपनीकडून कामे होणे अपेक्षित आहे. खरे तर आम्ही सर्व कामांची २६४ कोटींची निविदा काढण्याच्या बेतात होतो. परंतु, पहिल्या टप्प्यात ८८ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली. ज्यांच्याकडे जादा मशिीनरी, साहित्य आहे त्यांच्याकडूनच चांगले काम होईल. सध्या ज्यांनी निविदा भरली आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. - डॉ. अविनाश ढाकणे, सीईओ, सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन.
स्मार्ट सिटीतील रस्त्यांचे काम जादा दराने देण्यास आमचा विरोध राहील. या कामांची विभागणी करा. शहरातील इतर कंत्राटदारही यात सहभागी होतील. वेळेत हे काम पूर्ण होईल. यासंदर्भात आम्ही सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनाही पत्र देणार आहे. - संजय कोळी, सभागृह नेते तथा संचालक, स्मार्ट सिटी कंपनी.