- राकेश कदम सोलापूर - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपण अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही असे स्पष्टीकरण दिले. प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत असल्याचे सांगितले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. उमेश पाटील आणि संतोष पवार सोमवारी मुंबईत दाखल झाले. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बुधवार पाच जुलै रोजी सकाळी ११ वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीचा समन्वय साधनांची जबाबदारी उमेश पाटील आणि संतोष पवार यांच्यासह इतर विभागातील नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर आणि इतर कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहणार असे सांगितले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. साठे यांनी आपण अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज्यातील चित्र स्पष्ट होऊ द्या त्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया दिली.