- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आता सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा शुक्रवारी सायंकाळी दिला. याबाबतची माहिती शुक्रवारी कामगार संघटनांनी आयुक्त शितल तेली-उगले यांना निवेदन देऊन देण्यात आले.
सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्याबाबत शासन उदासीन आहे. सतत निवेदने, चर्चा, बैठका, मोर्चा काढूनही मागण्या मान्य होत नाही त्यामुळे महापालिका कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे या मागणीसाठी १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपावर जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव, अजय क्षीरसागर, बाली मडेपू, जनार्दन शिंदे, बाबासाहेब क्षीरसागर, शशिकांत शिरसट, चांगदेव सोनवणे, बापू सदाफुले, तेजस्विनी कासार आदी उपस्थित होते.