लक्ष्मण कांबळे/ कुर्डूवाडी
माढा तालुक्यातील पिंपळनेर गावच्या हद्दीत वैराग- पुणे स्वारगेट ही एसटी बस सुमारे ५५ प्रवासी घेऊन जात असताना चालकाला (चालक -नवनाथ कळसाईत) अचानक फिट आल्याने एसटी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यामध्ये एकूण २४ जखमी झाले असून त्यातील एक महिला व एक पुरुष फ्रॅक्चर व डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कुर्डूवाडी आगाराची एसटी बस क्रमांक एम एच १४ बीटी -०९७२ ही वैराग बस स्टॅन्ड येथून येथून सकाळी ७.४५ दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती, ती कुर्डूवाडी बस स्टँड वर ९.३० च्या दरम्यान आली. तिथे एन्ट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली त्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटातच ९.५० च्या दरम्यान रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीत चालकाला अचानक फिट आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली त्यामध्ये चालक व वाहकही किरकोळ जखमी झाले आहेत. तीन ॲम्बुलन्स द्वारे सर्व प्रवाशांना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रविकिरण कदम, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, आगार प्रमुख लाड यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली.