- अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांचा साखर हंगाम वेगात सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप हंगाम सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३७ पैकी २५ पेक्षा अधिक कारखाने बंद झाले, तर नऊ कारखाने चार-पाच दिवसांत बंद होतील, असे सांगण्यात आले.
राज्यात यंदा आतापर्यंतचा उच्चांक पार करीत २०४, तर सोलापूर जिल्ह्यात ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सोलापूर जिल्ह्याने सोलापूरचाच विक्रम मोडीत काढला आहे. मागील वर्षी राज्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यात यावर्षी वाढ होत संख्या ३७ इतकी झाली आहे.
यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने गाळप हंगाम सुरू करताना अडचणी आल्या होत्या. काही जिल्ह्यांत १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू झाले, मात्र सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी पावसाच्या पाण्याचा अडथळा होता. त्यामुळे ऑक्टोबर अखेर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा कारखाने सुरू होण्यास लागला. उशिरा कारखाने सुरू होऊनही सोलापूर जिल्ह्यात ऊस शिल्लक राहिला नसल्याने जानेवारी महिन्यात एक कारखाना बंद करावा लागला. २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २५ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांतील कारखाने मात्र सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून दिसत आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच कारखान्यांचा पट्टा पडेल असे दिसते.
मागील वर्षी उसाचा एकरी उतारा सरासरी ४५ ते ४० टन इतका होता. यंदा वजनात मोठी घट झाली आहे. एकरी २० ते २२ टन इतकाच उतारा पडला आहे. उतारा कमी पडल्याने शेतकऱ्यांचे व गाळप हंगाम लवकर आटोपल्याने कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किमान १५० दिवस पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू राहिले पाहिजेत.- महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल ॲग्रो बीबीदारफळ