आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मागील दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील तापमानात मोठया प्रमाणात घट झाली आहे. ३७ अंशावर पोहोचलेले तापमान ३५ ते ३६ अंशावर आले आहे. दरम्यान, वाऱ्याचा वेग वाढला असून सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसानही झाले आहे. या नुकसानीच्या बातम्या पाहून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीही चांगलाच धास्तावला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास काही भागात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली आहे. जो तो शेतकरी आपल्या शेतातील काढणीला आलेला गहू, ज्वारीची रास करून घेण्यात दंग आहे. शिवाय ग्रामीण भागात वारेही जोरात वाहू लागले आहे.
ढगाळ वातावरणामुळे सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी याचे देखील अतोनात नुकसान होत आहे. बळीराजाने मोठ्या कष्टाने पिकवलेलं पावसाने धुवून काढलं तर मोठे नुकसान होईल अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहे. आधीच कांद्याने अडचणीत आल्याने शेतकरी अडचणीत आला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.