आप्पासाहेब पाटील, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. काटेरी झुडूपात अडकलेला मृतदेह रेस्क्यू टिमने मोठया प्रयत्नाने बाहेर काढले.
दरम्यान, ज्ञानेश्वर याचे पाण्यावर केवळ डोकं दिसत हाेतं, उर्वरित मृतदेह पाण्यात आढळून आला. तातडीने याबाबतची माहिती पोलिस व तहसिल प्रशासनाला देण्यात आली. तातडीने सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व तहसिलदार गजानन जमदाडे हे दाखल झाले. पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालय, सोलापूर येथे पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्याना पूर आला आहे, कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकी वरील तिघे वाहून गेले होते त्यापैकी दोघे वाचले पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला.