दीपक दुपारगुडे
सोलापूर : गुड्डेवाडी (ता. अक्कलकोट) येथे अवैध वाळू उपसा करीत असताना महसूल पथकाने कारवाई करण्यासाठी घेऊन जाणारे ट्रॅकटर हे धक्काबुक्की करत परत पळवून नेले. अरेरावी करत कारवाईत अडथळा आणला म्हणून चार जणांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २१ मार्च रोजी घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. २१ मार्च रोजी महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत प्रशांत मंगरुळे (रा. गुड्डेवाडी, ता. अक्कलकोट), शिवानंद बिराजदार (रा. कलकर्जाल, ता. अक्कलकोट) अनिल बिराजदार, सुनील बिराजदार (रा. कलकर्जाळ, ता. अक्कलकोट) यांनी भीमा नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे अवैध वाळू वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर पकडले.
यानंतर कारवाई केलेले टॅक्टर पकडून कारवाईसाठी घेऊन जात असताना चौघांनी मिळून महसूल पथकास धक्काबुकी, दमदाटी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन गेल्याची फिर्याद मंडळ अधिकारी मनोज सिद्राम गायकवाड (वय ४७ ) यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार पांढरे करीत आहेत.