सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज तलाव व स्मृती उद्यान शेजारी असलेल्या रेल वनविहार येथे झाडांना दोन महिन्यापूर्वी आग लागली होती. आगीमध्ये झाडांची पाने, फांद्या जळून गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी झाडांची काळजी घेतली. पाणी व खत देण्यात आले. यामुळे पुढील दोन महिन्यापासून आगीत होरपळलेल्या झाडांना पालवी फुटली.
झाडांना पुनर्जिवित करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे पर्यावरण प्रेमीं योगेश शेषगिरी, रोहीत मैंदर्गीकर हे वनविभागातील झाडांना नियमित रोज पाणी देऊन उन्हाळ्यात सुद्धा झाडं हिरवीगार ठेवून उल्लेखनीय काम केलं. पालवी फुटलेल्या झाडांसोबत आणखी झाडे लावत अक्षय तृतीया सण साजरा झाला. शुक्रवार १० मे रोजी रेल्वे वन विहार येथे मंडल रेल प्रबंधक नीरजकुमार दोहरे यांच्या हस्ते झाडांची पूजा करुन अक्षय तृतीया सण झाडांसोबत साजरा करण्यात आला. तेथील रहिवासी मोतेकर यांच्याकडून पाणी घेऊन प्रत्येक झाडाला देण्यात आले.
अक्षय तृतीया निमित्त आंबा, नारळ, सिताफळ, बांबू आणि कारंज अशी नवी रोपटी लावण्यात आली. त्याचबरोबर पक्षांसाठी रुक्मिणी कदम यांनी जवळपास १०० जल-कुंडांचे दान केले. झाडांवर पाण्याची सोय केली. शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी जितेंद्र. वाघमारे, शिवाजी कदम, रामचंद्रन, बी. आर. भगत, पर्यावरणप्रेमी प्रवीण तळे, संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार, संरक्षा विभागाची संपुर्ण टिम उपस्थित होती.