राकेश कदम, साेलापूर: काेराेनाच्या लाॅकडाउनमध्ये देशवासीयांनी काेराेना याेध्दांना प्राेत्साहन देण्यासाठी केलेला थाळीनाद अजूनही स्मरणात आहे. या थाळीनादाचे अनेकांना काैतुक वाटले आणि अनेकांनी या प्रकाराची टिंगलही केली. साेलापुरात पुन्हा ‘थाळीनाद’ हाेणार आहे. याला कारण ठरले शहरातील पाणी टंचाई. आयाेजक आहेत साेलापूर विकास मंच.
साेलापूर विकास मंचने रविवार, २६ मे राेजी साेलापूर शहरात थाळीनाद आंदाेलन करण्याचा निर्धार केला आहे. साेलापूर विकास मंचचे विजय जाधव यांनी या अनाेख्या आंदाेलनाबद्दल माहिती दिली. जाधव म्हणाले, साेलापूर शहरातील नागरिक ३६५ दिवसांचा कर भरतात. तरीही शहराला जेमतेम १०० दिवस अवेळी पाणी पुरवठा हाेताे. हा पुरवठा गढूळ, दुर्गंधीयुक्त असताे. ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी कामगार आपली कामे साेडून पाणी भरत राहतात.
‘पाण्याचा दिवस’ असला की लाेकांना कामधंदे साेडून पाणी भरत रहावे लागते. महापालिकेच्या या नियाेजनशुन्य कारभाराचा निषेध म्हणून आम्ही थाळीनाद आंदाेलनाची हाक दिली आहे. साेलापूरकरांनी रविवारी दहा वाजता आपल्या घरात बसूनच हे आंदाेलन करावे. या आंदाेलनात शहरातील विविध संघटना सहभागी हाेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.