- काशिनाथ वाघमारे सोलापूर - माढा तालुक्यात कन्हेरगाव येथे एका शेतकरी कुटूंबाला उकाड्याने हैराण होऊन घराच्या छतावर जाऊन झोपणे चांगलेच महागात पडले आहे. रात्रीत घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३ लाख ६४ हजारांचा ऐवज पळवल्याची घटना घडली. मध्यरात्रीत चोरट्यांनी घर फोडल्याचे पहाटे निदनर्शनास येताच या कुटूंब प्रमुखाने पोलिसात धाव घेतली. ही घटना २ जून रोजी रात्री घडली असून याबाबत जोतीराम बबन भरगंडे यांनी टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घरफोडीने गावात खळबळ उडाली आहे.
पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार ज्योतीराम भरगंडे यांचे कुटुंबीय शुक्रवार, २ जून रोजी रात्री जेवण आटोपून घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी दरम्यान चोरट्यांनी भरगंडे यांच्या दरवाज्याचे सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश केला. कपाट उचकटून रोख १ लाख ३० हजार रुपये व कपाटातील एक तोळे सोन्याचे नेकलेस, तीन तोळ्याचे गंठण, अर्ध्या तोळ्याची साखळी व अर्ध्या तोळ्याच्या चार अंगठ्या असे २ लाख ३४ हजार किंमतीचे ७ तोळ्याचे सोन्याचे दागीने चोरून नेले आहे.
या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सकाळी कन्हेरगाव येथे घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळावर धाव घेतली. अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करीत आहेत.
ठसेतज्ज्ञ अन श्वानपथकाला पाचारण...शनिवारी दुपारी सोलापूर येथील ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस हवालदार जयवंत सादुल , पोलीस हवालदार उमेश गुटाळ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल यांनी घटनास्थळी भेट देऊन ठशांचे नमुने घेतले. त्यानंतर श्नानपथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकाचे पोलीस हवालदार गावडे, पोलीस हवालदार जंगले यांनीही प्रयत्न केला. हे श्वान रतिलाल मोरे यांच्या मोरे वस्ती पर्यंत धावले.
जनावरांना शेड बांधण्यासाठी बँकेतून काढली होती रोकडभरगंडे यांनी दहा दिवसापूर्वीच जनावरांचा शेड बांधण्यासाठी बँकेतून १ लाख ५० हजार रुपये काढले होते. त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते व १ लाख ३० हजार रुपये त्यांनी साडीत गुंडाळून कपाटात ठेवले होते.