सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये, विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. २६ मे पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ मे २०२४ पासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २६ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. २९ ते ३१ मे २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.
पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्स या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे.