सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नूतन कुलसचिव पदासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ३ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच कुलसचिव असलेल्या डॉ.गणेश मंझा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महिनाभर विद्यापीठाचे काम प्रभारी कुलसचिवांवर चालले होते. अर्ज मागवण्याच्या प्रक्रियेनंतर लवकरच नव्या कुलसचिवांची वर्णी लागेल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर विद्यापीठाची सन २००४ मध्ये सुरुवात झाली. या कालावधीत व्हटकर, पोपट कुंभार, शेजूळ, एस. के. एस. माळी, नितीन सोनजे, देवेंद्र मिश्रा आणि महिन्यापूर्वी राजीनामा दिलेले डॉ. गणेश मंझा यांनी कुलसचिव पदाचा कार्यभार पाहिला. डॉ. मंझा यांनी तर एक वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच आपला राजीनामा दिला. याबद्दल अनेक तर्कवितर्कही लढवले गेले आणि युवा महोत्सव पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पायउतार व्हावे लागले आणि पुन्हा ते आपल्या स्वगृही गेले. यानंतर प्रभारी कुलसचिवाचा कार्यभार घुटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नव्या कुलसचिव पदासाठी सोलापूर विद्यापीठाने गेल्या ३ नोव्हेंबरपासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ३ डिसेंबर अंतिम मुदत असणार आहे. यानंतर लवकरच अधिकृत कुलसचिवपद विद्यापीठाला मिळणार आहे.
वादातले पद...- सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून नेहमीच कुलसचिव कोणत्या ना कोणत्या कारणावरून कुलसचिवपद हे वादाच्या भोवºयात सापडले आहे. डॉ. एन. एन. मालदार यांच्या कालावधीत असलेले तत्कालीन कुलसचिव एस. के. माळी यांचा कार्यकाळ वगळता आजवरचे सर्वच कुलसचिव वादग्रस्त ठरले आहेत. नोकरभरती, इमारत बांधकाम, अंतर्गत कर्मचाºयांचे आरोप-प्रत्यारोप, धोरणात्मक निर्णय अशी कारणांची याला जोड आहे. वर्षापूर्वीच पायउतार झालेले डॉ. गणेश मंझा यांनाही अशाच पद्धतीने राजीनामा द्यावा लागल्याचा आजवरचा इतिहास सांगतो.