सोलापूर: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली असून, आमदार रोहित पवार यांचाही समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे नियुक्त केलेल्या सदस्यांवरून दिसून येत आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अ. म. बाविस्कर यांनी समिती गठित केल्याचे परिपत्रक जारी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. याच इमारतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणीसंदर्भात लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडून विद्यापीठाकडे मागणी केली होती. यानुसार विद्यापीठ व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारक समिती गठित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे तीन, सेनेचे चार, शेकापचा एक व अन्य एक अशा १७ जणांचा समावेश आहे.
समिती अशी.....
स्मारक समिती पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष : पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सदस्य : आमदार रोहित पवार, उत्तम जानकर, बाळासाहेब पाटील,अशाेक पाटील, शेकाप: डॉ. अनिकेत देशमुख, काँग्रेस: चेतन नरोटे, आदित्य फत्तेपूरकर, बाळासाहेब शेळके, सेना: श्रावण भंवर, अस्मिता गायकवाड, सारिका पिसे, जगन्नाथ क्षीरसागर, सुचिता बनकळसे, कार्याध्यक्ष: कुलगुरू मृणालिनी फडणवीस, समन्वयक: डी. बी. घुटे.