सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा राज्याचे शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास स्थगिती देण्याचा निर्णय दिला.
विद्यापीठाला पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देण्यावरून धनगर समाज आणि लिंगायत समाज आमने-सामने आले होते. मात्र याप्रकरणी राज्य सरकारने या दोन्ही समाजात समेट घडवून आणत विद्यापीठास पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देत नाम विस्तार करण्याचा निर्णय घेतला. तसेच या नाम विस्ताराचा कार्यक्रम ३१ मे रोजी आयोजित करण्याची घोषणाही केली. परंतु याप्रकरणी एका व्यक्तीने नाम विस्ताराला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्यावरील सुणावनी वेळी उच्च न्यायालयाने नामविस्तार ५ जून पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय दिला.
यासंदर्भात शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारास न्यायालयाने ५ जून पर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाच्या निकालावर अधिकचे भाष्य करणे टाळले. यात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड़ सतीश तळेकर आणि अॅड़ सुधीर हळ्ळी यांनी काम पाहिले़