संताजी शिंदे, सोलापूर : तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव, सप्टेंबर शेवटच्या किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी विकास विभागाने महोत्सवासाठी ग्रामीण भागातील एका महाविद्यालयाची निवडही केली आहे. लवकरच महाविद्यालयाचे नाव व तारीख जाहीर होणार आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थी विकास विभागाने, युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागवले होते. एका महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, तो अंतिम करण्यात आला आहे. ११ तालुक्यापैकी कोणत्या महाविद्यालयाला यजमानपद मिळाले आहे हे सध्यातरी समजू शकले नाही. येत्या चार ते पाच दिवसामध्ये महाविद्यालयाचे नाव अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. ३ ते ४ दिवसाचा हा युवा महोत्सव असणार असून यामध्ये तरूणाईच्या कलागुणांचा आविष्कार होणार आहे.
७० ते ७५ विद्यालयाचा असणार सहभाग
जिल्ह्यातील ११० महाविद्यालये हे विद्यापीठाशी संलग्नीत आहेत. युवा महोत्सवात प्रतिवर्षी ६५ ते ७५ महाविद्यालयाचा सहभाग असताे, यंदाच्या वर्षीही ७० ते ७५ महाविद्यालय सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बहुतांश महाविद्यालयांनी युवा महोत्सवाच्या तयारीला सुरूवातही केली आहे.
युवा महोत्सवासाठी महाविद्यालय फायनल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालय असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. महोत्सवाचे वेळापत्रकही तयार करण्यात येत आहे. कुलगुरूंच्या परवानगीने सर्व माहिती सांगितली जाईल. -केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.