सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 'पीएच.डी. प्रवेशपूर्व पेट-९ परीक्षेसाठी, २२ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० व ३१ जुलै रोजी पेट-९ परीक्षा होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.
विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडून पी.एचडी प्रवेशासंदर्भात प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पीएचडीसाठी प्रवेश घेण्यासंदर्भात सुरुवातीला पेट परीक्षा (एंट्रन्स एक्झाम) विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. याकरिता १३ जून २०२४ पासून विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. यंदा ही परीक्षा ऑनलाइन अँड्रॉइड बेस्ड पद्धतीने होणार असल्याने, परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 'पेट' देता येणार आहे. ही परीक्षा २१ आणि २२ जुलैला होणार होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी 'पीएच.डी' च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. विषयनिहाय संशोधक मार्गदर्शकांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'पेट'साठी दोन पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या ॲन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही परीक्षापरीक्षा देता येणार आहे. पण, कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पेपर सोडविण्यासाठी प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे.
पेट-९ परीक्षा वेळापत्रक
पेट परीक्षा देण्यासाठी २२ जुलै २०२४ पर्यंत अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांची २५ व २६ जुलै २०२४ रोजी पूर्व तयारीची ऑनलाइन मॉक टेस्ट होणार आहे. याचबरोबर एका विषयातून 'पेट' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० जुलैला परीक्षा देता येणार आहे. ३० जुलै रोजी सकाळच्या सत्रात कॉमन पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. त्यानंतर दुपारचे सत्रात संबंधित विषयाची परीक्षा होणार आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची संबंधित विषयाची परीक्षा ३१ जुलैला होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी ही कॉमन पेपर ३० जुलै रोजीचीच गृहीत धरली जाणार आहे. केवळ संबंधित विषयाची पेपर दुसऱ्या दिवशी ३१ जुलै रोजी देता येणार आहे. ६ ऑगस्ट २०२४ रोजी निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.