सोलापूर: सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील प्रदूषित पाणी दीर्घकाळ आहे तसे पिण्यास वापरले तर भविष्यात कॅन्सर होऊ शकतो. धरणाच्या आजूबाजूला असणारी ५१ गावे अन् ४७ हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यांच्यावर सोलापूर विद्यापीठाची टीम संशोधन करीत आहे. त्यांच्या प्राथमिक सर्वेक्षणात हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
सोलापूर विद्यापीठाने ‘शाश्वत उजनी धरण एक दृष्टिकोन’ हा विषय निवडून संशोधन सुरू केले आहे. यासाठी मुख्य जबाबदारी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. पी. धुळप, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एम. जी. माळी हेही संशोधनासाठी साहाय्य करीत आहेत.
या समितीने केलेल्या सर्वेक्षणात ५१ गावे आणि ४७ हजार कुटुंबे बाधित झाल्याचे समोर आले. यातील ५ गावे आणि २३५ कुटुबांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. यासाठी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि नगर जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. उजनी धरण झाल्यानंतर कसे बदल झाले व बाधित कुटुंबांची सद्यस्थिती काय आहे, हे या संशोधनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन वर्षे ही संशोधनाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यासह शेजारचा उस्मानाबाद, पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागांना उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, कुर्डूवाडी, करमाळा या तालुक्यातील गावांनाही हा पाणीपुरवठा होतो. या पाण्यामध्ये आजवर झालेल्या संशोधनामध्ये सल्फेट, नायट्रेट, सॉलिड यासारखे घातक घटक आढळून आले आहेत. हे माणसांच्या काय जनावरांच्या आरोग्याला घातक असल्याचे समोर आले आहे.
सद्यस्थितीला उजनी धरणाभोवतीच्या कुटुंबांनी आहे तसे पाणी पिणे धोकादायक आहे. त्याचे शुद्धीकरण आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
माणसांशिवाय शेतीसाठीही हे पाणी अपायकारकउजनी धरणातील विविध ११ ठिकाणांहून पाण्याचे नमुने तपासणीला घेतले आहे. सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्र संकुलात या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार उजनीतील पाणी मानवी आरोग्य व शेतीसाठी अपायकारक असल्याचे निष्कर्ष आले आहेत. यावर सविस्तर संशोधन सुरू आहे. पाण्यात डिझाल आॅक्सिजन, बायोकेमिकल आॅक्सिजन, केमिकल आॅक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेट आढळून आले असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केलेय.
मुलं अन् वृद्धांना घातक
- - धरणातून सोलापूरला येणारे पाणी सात ठिकाणी शुद्धीकरण होऊन येते. यामुळे याचा थेट परिणाम होण्याचा संभव कमी आहे. मात्र शुद्धीकरण होऊनही या पाण्यातील टीडीएसचे प्रमाण ४०० ते ५०० आहे. हे लहान मुले आणि वृद्धांना धोकादायक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
- - भीमा नदीच्या खोºयावर उजनी धरणाची निर्मिती झालीय. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औद्योगिक वसाहतीतून दूषित पाणी धरणात येते. आजूबाजूच्या शेतीला दिलेली खतं, कीटकनाशकं मिश्रित पाणी धरणात येऊन मिसळतेय. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक आढळली असल्याचे प्रकल्प संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी सांगितले.
कॅन्सरसह अन्य आजाराला आमंत्रण- धरणाच्या पाण्याचा आजवर झालेला हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. उजनी धरणाचं पाणी दूषित आहे, याची चर्चा होतीच. मात्र आता त्यावर सोलापूर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहर आणि या गावांच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पात उजनीचे हे दूषित पाणी स्वच्छ करण्याची क्षमता नाही. त्यामुळे कॉलरा, मलेरिया आणि पचन क्षमता कमी होण्याचे रोग होऊ शकतात. तसेच कॅन्सरचाही धोका असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
उजनी धरणाच्या भोवताली असलेल्या ५१ गावे आणि ४७ हजार कुटुंबीयांच्या बाबतीत हा निष्कर्ष समोर आला आहे. या भागात वास्तव्य करणाºया नागरिकांनी धरणातील पाणी आहे तसे पिल्यास त्यांना भविष्यात कॅन्सरसह अन्य आजारांना सामोरे जावे जागणार आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाणी उकळून पिण्याची आवश्यकता आहे किंवा शुद्ध पाण्याचा वापर केला पाहिजे.- डॉ. गौतम कांबळे, संचालक, सामाजिकशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ