सोलापूर : सोलापूर शहरात सर्वत्र तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा, रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला आहे. ४२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची शनिवारी नोंद झाली आहे. पुढील पाच दिवसांत तापमानात आणखी तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात घट झाली होती. मागील आठवड्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदले होते. दोन दिवसांपासून ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र शनिवारी अचानक ४२ अंशावर तापमान पोहोचले. वाढत्या तापमानाचा पारा आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. उष्माघाताचा त्रास होऊ नये याबाबत आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या असून जिल्ह्यात ७३ उष्माघात केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.