साेलापूर : महापालिकेच्या तिजाेरीत ठणठणाट असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे कर भरायला पालिकेत येणारे आणि ऑनलाइन भरणाऱ्या नागरिकांचे हाल बेहाल असल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.
मनपाने ३१ ऑगस्टपर्यंत कर भरल्यास ५ टक्के सूट जाहीर केली आहे. डिजिटल पेमेंटसाठी १ टक्के जादा सूट आहे. कर भरण्यासाठी हुतात्मा स्मृतिमंदिराच्या शेजारील एका हाॅटेलच्या जागेत पाच खिडक्या आहेत. या कार्यालयात अनेकदा पुरेसे कर्मचारी नसतात, अशी तक्रार वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अविनाश भडकुंबे यांनी केली. या जागेतील एक किंवा दाेन खिडक्या अनेकदा बंद असतात. कर भरायला आलेले लाेक तासन् तास रांगेत थांबलेले असतात. खिडक्यांजवळ थांबायला पुरेशी जागा नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस आल्यास लाेकांना त्रास हाेऊ नये यासाठी पालिकेने व्यवस्था केलेली नाही. डिजिटल पेमेंट घेण्याचे काम केवळ बऱ्याचदा एकाच खिडकीजवळ चालते. त्यामुळेही लाेक वैतागलेले असतात. मनपाच्या इतर आठ कर संकलन केंद्रांची माहिती लाेकांपर्यंत पाेहाेचलेली नसल्याचेही भडकुंबे यांनी सांगितले.
अडचण साेडवायला नेमलेले लाेक असतात गायब - गुमटे
काॅँग्रेस कार्यकर्ते शरद गुमटे म्हणाले, आमच्या प्रभागातील अनेक लाेकांनी डिजिटल पेमेंट केले हाेते. तरीही त्यांना पुन्हा बिले आली आहेत. त्यांची अडचण साेडविण्यासाठी केवळ एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी सायंकाळी चार ते सहा या वेळेत यावे, असा फलकही कर संकलन कार्यालयात लावण्यात आला आहे. ही अडचण साेडविणारे कर्मचारी अनेकदा गायब असतात. लाेक पुन्हा डिजिटल पेमेंट कसे करतील, असा सवालही गुमटे यांनी केला.
गेल्या दाेन वर्षांपासून कर संकलन विभागात गाेंधळ आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर संकलनाचा गाेंधळ दूर करण्याचे आश्वासन दिले हाेते. परंतु, हा गाेंधळ वाढतच असल्याचे दिसून येते. आमचा कर वेळेवर घ्या. कर घेण्यासाठी चांगली व्यवस्था करा म्हणून आंदाेलन करायची वेळ बहुतेक साेलापूरकरांवर येणार आहे. असे आंदाेलन झाले तर महापालिकेची नामुष्की असेल.
- फिरदाेस पटेल, नगरसेविका