सोलापूर : सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती एका वर्गाला वाटत आहे; पण तसे होणार नाही. आगामी पाच वर्षांत सोलापूरला १५ वर्षे पुढे न्यायचे आहे. यासाठी मी अगदी जमिनीवर राहून अतिशय गंभीरतेने, समन्वयाने राजकारण आणि समाजकारण करणार आहे, असा निर्धार नवनिर्वाचित खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी आज येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून दीड लाखावर मतांनी विजय संपादन केल्यानंतर अॅड. बनसोडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुशीलकुमार हे मनमिळाऊ आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्यांचा पराभव झाल्यामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती मतदारसंघातील एक वर्ग व्यक्त करीत आहे; पण मी संपूर्ण वेळ देऊन येथे काम करणार आहे. प्रारंभीच्या काळात मंगळवार, बुधवार आणि गुरूवार हे आठवड्यातील तीन दिवस मी सोलापुरात राहणार आहे. त्यातील मंगळवारचा दिवस सोलापूर शहरातील कामांसाठी देणार आहे. बुधवार आणि गुरूवारी दुपारी १ वाजेपर्यंत शहरात थांबणार आहे आणि त्यानंतर हे दोन दिवस ग्रामीण भागात राहणार आहे. काही दिवसांनंतर मुंबईतील माझा व्यवसाय पूर्ण बंद करून सोलापुरातच वास्तव्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. अॅड. बनसोडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सोलापुरात प्राधान्याने कोणती कामे करायची, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली; पण पत्रकारांनीच बनसोडे यांचा हा चेंडू पुन्हा त्यांच्या कोर्टात टाकून त्यांनीच प्राधान्य कामांचा क्रम सांगावा, अशी विचारणा केली. यावर अॅड. बनसोडे म्हणाले, मूल्यवर्धित कर व्यापार्यांना परवडतो, तो देण्याची त्यांची तयारीही आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हटविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा कर रद्द केल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न कमी होऊ नये, यासाठी समग्र निधी स्थापण्याची सरकारकडे विनंती करणार आहे. सोलापुरातील हातमाग उद्योग वाढीस लावण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय औद्योगिक वसाहतींमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागी नवीन उद्योग सुरू करणे किंवा तो कारखाना पुन्हा चालू कसा होईल, यासाठीही माझे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.
-----------------------------
मला समजा शिंदेंचा प्रतिनिधी: बनसोडे
सोलापूरसाठी विमान सेवा सुरू करण्याला प्राधान्य देणार असून, ‘गो एअर’विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न
चेंबरच्या पदाधिकार्यांशी चर्चा करुन एलबीटी रद्द करण्यासाठी निवेदन करणार आणि थेट नरेंद्र मोदींना साकडे घालणार
नजीक पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही तीर्थक्षेत्रे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. यासाठी विशेष प्रयत्न करणार
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण नंदेश्वर येथे पाणी परिषद घेणार ४सोलापूरचा विकास करण्यासाठी मी सकारात्मक पावले उचलणार असून, सुशीलकुमार शिंदे खासदार नाहीत म्हणून काही फरक पडणार नाही.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. सोलापूरचे प्रश्न तांत्रिक पध्दतीने मांडणे जमले नाही तर ते भावनिक पातळीवर तरी मी मांडू शकतो. सोलापूरच्या विकासासाठी हवे तर मला शिंदे यांचा प्रतिनिधी समजा..