सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये पुढील पाच वर्षांत सोलापूर शहर व जिल्ह्यात नव्याने पारंपरिक व व्यावसायिक असे एकूण २१ महाविद्यालये सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.२०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणाºया सात महाविद्यालयांसाठी सध्या शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाकडून शासनाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर शहर व जिल्ह्यातील मान्यवर व नागरिकांकडून आॅनलाईन शिफारशी व सूचना मागवून विद्यापीठाचा २०१९-२० ते २०२३-२४ पर्यंतचा पंचवार्षिक बृहत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने २१ महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. दरवर्षी काही नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. पहिल्यांदा सांगोला, अक्कलकोट येथे खास ग्रामीण भागातील मुलींसाठी महिला महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. पंढरपूर येथे रात्र महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथे प्रत्येकी एक पारंपरिक महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यात एक फार्मसी व सोलापूर शहरात विद्यापीठाकडून कौशल्य विकास महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी येत्या १ आॅक्टोबर २०१८ पर्यंत विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले.
त्याचबरोबर विद्यापीठ परिसरात भाषा संकुल सुरू झाले आहे. कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम सुरू आहे. येत्या काळात स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी, स्कूल आॅफ लाईफ सायन्स, स्कूल आॅफ फाईन अँड परफॉर्मिंग आटर््स स्कूल आॅफ एज्युकेशन सुरू होणार आहे. कॉमर्स अँड मॅनेजमेंट संकुलही सुरू होणार आहे. तसेच कॅम्पसमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर, हँडलूम अँड टेक्स्टाईल सेंटर, ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर आणि फूड प्रोसेसिंग अँड अॅग्रो बेस्ट प्रोडक्ट सेंटर सुरू होणार असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.एस. के. पवार, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.
प्रगतिशील विद्यापीठामध्ये सोलापूर विद्यापीठ राज्यात चौथेच्प्रगतिशील विद्यापीठाच्या दृष्टीने ‘हिंदुस्तान टाइम्स’कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सोलापूर विद्यापीठाचा महाराष्ट्रात चौथा क्रमांक लागला आहे. तर देशातील एकूण ९०० विद्यापीठांपैकी प्रगतिशील विद्यापीठामध्ये सोलापूरचा पहिल्या शंभरमध्ये समावेश असल्याचे कुलगुरु प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) कडून अनुदान मिळवण्यात सोलापूर विद्यापीठ राज्यात दुसºया स्थानी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठाने अल्प कालावधीत मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात आठ महाविद्यालये सुुरु होणार च्२०१९-२० शैक्षणिक वर्षापासून एकूण आठ महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत़ त्यामध्ये दोन महिला, एक रात्र, एक फार्मसी व तीन पारंपरिक महाविद्यालयांचा समावेश आहे. सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची चांगली सोय व्हावी, या दृष्टीने नवे महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ.व्ही. बी. पाटील यांनी सांगितले.