सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनी आपल्याला विष घातले, असा खळबळजनक आरोप महापालिकेतील भाजपचे माजी सभागृहनेते अन नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
थेलियम विषबाधा प्रकरणी सुरेश पाटील यांनी संशयितांची नावे असलेला जबाब जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात दिला आहे. या जबाबात अनेक मातब्बर मंडळींची नावे असून यासंदर्भात सुरेश पाटील यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला. दरम्यान, जबाब देऊनही आपली फिर्याद का दाखल करुन घेतली जात नाही, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.
६ डिसेंबर २०१७ रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे व नंतर मुंबईला हलविले होते. मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे दिल्याची घोषणा केली होती. पण ९ महिन्यांत सीआयडीची चौकशी रखडली. त्यामुळे सभागृहनेते संजय कोळी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अठरा दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर शहर पोलिसांनी सुरेश पाटील यांच्याशी संवाद साधून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली होती.त्यानंतर नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषबाधाप्रकरणी जोडभावीपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयितांची नावे सांगण्यास सुरेश पाटील यांनी मुदत मागितली होती. शनिवारी रात्री नगरसेवक सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी संशयित असलेल्या लोकांची नावे आपल्या जबाबात जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडगे यांना दिली आहेत. माझ्यावर झालेल्या विषप्रयोग प्रकरणी मी दिलेला जबाब ग्राह्य धरुन तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, जबाबातील नावे मोठी असल्यामुळे पोलिसांनी अद्याप चौकशीच्या नावाखाली कारवाई केली नसावी, अशी प्रतिक्रिया सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, नगरसेवक सुरेश पाटील यांनी मागितलेल्या वेळेनंतर संशयितांची नावे बंद लिफाफ्यातून दिली आहेत. सुरू असलेला तपास आणि मिळालेली नावे याचा अहवाल तयार करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जोडभावीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली.